राजकारणाच्या धकाधकीत मनाची सर्जनशीलता जपून उस्मानाबाद जिल्हयाच्या विकासाचा विचार करणारा एक संवेदनशील लोकनेता म्हणजे भैय्यासाहेब !
मानवी जगण्याशी संबंधित काही काही क्षेत्रे अशी असतात की तिथल्या रखरखाटामुळे माणसाची संवेदनशीलता, भावुकता, अलवारता करपून जावी. उदा. वैद्यकीय क्षेत्र, लष्कर…. तसेच राजकारण!
जिल्हयाच्या -तालुकाच्या प्रश्न-समस्या सोडवण्यात गुंतलेले राजकारणी राक्षसी सत्तास्पर्धेत रुक्ष होत नाही गेले तरच नवल! मात्र असे नवल घडते भैय्यासाहेब रूपाने! अर्थात आजवर उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक दिग्गज असे राजकारणीही लाभले. त्यांत मुख्य स्थान भैय्यासाहेबाना द्यावे लागते.
हळुवार अशी संवेदनशीलता लाभलेला प्रतापसिंह पाटील हा संवेदनशील माणूस ‘लोकनेता’ होतानाही संवेदनशीलच राहिला किंबहुना ही अखंड जागती संवेदनशीलताच त्यांना ‘लोकांचा भैय्या पाटील’ या उपाधीपर्यंत घेऊन गेली.
दुसऱ्याच्या दु:खाने माणूस म्हणून डोळ्यांत पाणी येणारा जेव्हा सांघिक पातळीवर ते पुसण्याचा कृतियुक्त यशस्वी प्रयत्न करतो तेव्हा तो लोकनेता म्हणून गणला जातो; आणि यातील सातत्य तो जेव्हा टिकवून ठेवतो तेव्हा तो ‘संवेदनशील लोकनेता’ म्हणून लोकांना आपला वाटतो.
मनाची सर्जनशीलता नवनिर्मितीचा पाया ठरते. कल्पक उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी हीच सर्जनशीलता उपयोगी पडते. इतरांना सुचू न शकणाऱ्या असंख्य हितकारक कृती-उपायांचा खजिना त्यांच्यातील सर्जनशीलता सतत लोकांसाठी खुला करीत असते. मग निमित्त कृषिविकासाचे असो, पाणी-समस्येचे असो, लढाई-दंगलीचे असो, साहित्य-संस्कृती विचारविनिमयाचे असो किंवा अन्य काही!
जनसमूहाला समृध्दीच्या, भरभराटीच्या, विकासाच्या, उन्नतीच्या वाटा दाखविणारी आणि प्रचंड मोठ्या जनसमूहाला एकत्रितपणे त्या वाटेवरून घेऊन जाणारी प्रगाढ क्षमता भैय्यासाहेबच्या सर्जनशील संवेदनशीलतेत आहे याचे प्रत्यंतर आपल्याला ठायी ठायी आलेले आहे.
उस्मानाबाद जिल्हया मध्ये सध्याच्या सर्व नेतेमंडळींच्या मांदियाळीत भैय्यासाहेबांचे स्थान अपूर्व व अद्वितीय असे आहे. कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रगतीची नेमकी दृष्टी असलेला एक प्रचंड अभ्यासू व सेवाभावी कार्यकर्ता दडलेला आहे.